आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

५ लाखांची गुंतवणूक, ५ वर्षांनी किती मिळतील? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मोदींनीही ठेवलेत पैसे

नितीन देशपांडे   104   06-07-2026 12:42:18

Pune 

भविष्यासाठी बचत करायची, पण पैसेही सुरक्षित राहायला हवेत आणि चांगला परतावाही मिळायला हवा, अशी अनेकांची अपेक्षा असते. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजना लोकप्रिय पर्याय मानली जाते.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. NSC ही भारत सरकारच्या पाठबळावर चालणारी पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. त्यामुळे शेअर बाजारातील चढ-उतारांचा या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. या योजनेत अवघ्या १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. तसेच गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.

किती मिळेल परतावा?

सध्या NSC योजनेवर वार्षिक ७.७ टक्के व्याज दिले जाते. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने जोडले जाते. म्हणजे दरवर्षी व्याज मूळ रकमेत जमा होत जाते आणि पुढील वर्षी त्यावरही व्याज मिळते.

करसवलतीचाही लाभ

जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना NSCमध्ये केलेल्या १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत करसवलत मिळते. तसेच या योजनेतील व्याज पहिल्या चार वर्षांत पुन्हा गुंतवले जात असल्याने त्या कालावधीतील व्याजावर स्वतंत्र कर भरावा लागत नाही. मात्र, पाचव्या वर्षी मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो.

मोदींचीही या योजनेत गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेत गुंतवणूक केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात या योजनेतील गुंतवणूक ७.६१ लाख रुपये होती. त्यानंतर ती वाढून ९.१२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, सुरक्षितता, निश्चित व्याजदर आणि करसवलतीचा लाभ या तीन कारणांमुळे पोस्ट ऑफिसची NSC योजना मध्यमवर्गीय आणि दीर्घकालीन बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये सातत्याने लोकप्रिय ठरत आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.