आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती

शरद लाटे  56   23-06-2026 23:35:43

 

------------------

मुंबई, दि. २३ : वरिष्ठ सनदी अधिकारी विक्रम कुमार यांनी आज (दि. २३) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे महापारेषणला अनुभवी, दूरदृष्टी असलेले आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचा अनुभव असलेले नेतृत्व लाभले आहे.

 

महाराष्ट्र कॅडरच्या २००४ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले विक्रम कुमार यांना नागरी प्रशासन, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक प्रगती आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील दोन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. महापारेषणमध्ये रुजू होण्यापूर्वी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त महानगर आयुक्त-१ म्हणून कार्यरत होते. त्यांनी मार्च २०२४ पासून ही जबाबदारी सांभाळली होती.

 

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेल्या विक्रम कुमार यांनी महाराष्ट्र शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

 

तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

महापारेषणचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून विक्रम कुमार यांच्यासमोर ऊर्जा संक्रमण, राज्यातील पारेषण जाळ्याचा विस्तार, अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे प्रभावी एकत्रीकरण, ग्रीडचे आधुनिकीकरण आणि महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे बळकटीकरण ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महापारेषण या क्षेत्रांत अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

देशातील आघाडीच्या वीज पारेषण कंपन्यांपैकी एक असलेल्या महापारेषणकडे महाराष्ट्रभर विस्तृत अतिरिक्त उच्चदाब (EHV) वीज पारेषण यंत्रणा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक विकासासाठी अखंड व विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात कंपनीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 

महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रम कुमार यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या विकासाला नवी दिशा मिळेल तसेच कार्यक्षमता, नावीन्य आणि उत्कृष्टतेच्या वाटचालीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.