Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा रविवारी रात्री करण्यात आली. उमेदवारी निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक तब्बल अडीच तास चालली.
अखेर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
परंतु या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आग्रही होते. तसेच, खासदारकी मिळाल्यानंतर पुतणे समीर यांना मंत्रिपद मिळावे, अशी अटही त्यांनी घातली होती. मात्र, राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागेल अशी आशा बाळगून असलेले छगन भुजबळ पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नुकतेच राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार अर्ज भरला. यावेळी छगन भुजबळ देखील उपस्थित होते. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी म्हणाले की, “मला राज्यसभा आणि लोकसभेला जायचं होतं. चार पाच वेळा संधी आली. दुर्देवाने संधी मिळाली नाही. यावेळी जायचं आहे. मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार आणि त्यांचे पुत्र देखील आमदार आहेत. तर मलाही हा नियम लागू करण्याची विनंती केली.
पण वर कम्युनिकेट करायला वेळ लागला असावा. भाजपकडे प्रपोजल गेलं. जेव्हा मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा विचार करू. असं कळलं. त्यामुळे भाजपने कार दिला यात तथ्य नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हूं’
तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, ‘अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू’, अशी सूचक टिप्पणी भुजबळ यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती,” असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेन, अशी अट ठेवली होती परंतु भाजपने भुजबळांचा हा प्रस्ताव अंमलात आणण्यास असमर्थता दर्शविली असल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ यांनी आपली भूमिकाही मांडली आहे.