Pune
मराठा समाजाला पूर्णपणे न्याय मिळावा, मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. आज शनिवारपासून (ता.30 मे) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नेहमी सावलीत तंबू ठोकून उपोषणाला बसणारे मनोज जरांगे पाटील यंदाच्या वेळी भरउन्हात उपोषणाला बसले आहेत. अंतरवालीतील शेतात भरउन्हात जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायचे असले तरी या उन्हात येऊन भेटावे लागेल आणि इथेच चर्चा करावी लागेल, असे जरांगेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जरांगेंसोबत अनेक मराठा आंदोलकही या भरउन्हात येऊन उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे 35 अंश तापमानामुळे कोणत्याही आंदोलकाला काहीही झाले तरी त्याला फडणवीस सरकार जबाबदार असेल, असा इशाराच जरांगेकडून देण्यात आला आहे.