Pune
देशभरात खळबळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक गडद होत चालले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून खासगी क्लासचालक, शिक्षक, एनटीए संबंधित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या सीबीआयकडून आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. जवळपास १५० विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत.
दरम्यान, आता प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याच्या क्लासेसबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्पेशल बॅचेसच्या नावाखाली मोटेगावकर याने विद्यार्थ्यांकडून जास्तीचे पैसे घेऊन पेपर लीक केल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तपत्राने थेट आरसीसीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ही माहिती उघड झाली आहे. मोटेगावकरने स्पेशल बॅचच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून ४५ हजार रुपये अधिकचे घेत, हे पेपर फोडल्याचं सांगण्यात येत आहे.
'स्पेशल बॅच'च्या नावाखाली कोट्यवधींची उलाढाल?
मिळालेल्या माहितीनुसार, क्लासमधील सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा जास्तीचे पैसे मोजणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. मोटेगावकर याने एक स्वतंत्र 'स्पेशल बॅच' तयार केली होती. या विशेष बॅचमधील विद्यार्थ्यांनाच स्वतंत्र 'गेस पेपर', विशेष नोट्स आणि गुप्त प्रश्नसंच पुरवले जात होते.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल बॅचसाठी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक रक्कम आकारली जात होती. इतकेच नव्हे तर, गोपनीयता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी 'एम्स टॉपर' आणि 'अर्जुना' अशा नावांचे विशेष व्हॉट्सॲप ग्रुप्स देखील तयार करण्यात आले होते. स्कॉलरशिपचे (शिष्यवृत्ती) आमिष दाखवून किंवा कारण सांगून प्रत्येकाकडून रोख स्वरूपात वेगवेगळी फी वसूल करण्यात आली होती, असाही दावा एका विद्यार्थ्याने केला आहे.
"मी मोटेगावकर सरांच्या स्पेशल बॅचचा विद्यार्थी होतो. सरांनी आम्हा काही ठराविक विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे बोलावून घेतले आणि मॉकटेस्टच्या नावाखाली ते प्रश्न दिले होते. माझ्याकडून थेट पेपरचे म्हणून वेगळे पैसे घेतले नाहीत. परंतु, या स्पेशल बॅचची एकूण फी ही इतर सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा ४५ हजार रुपयांनी जास्त होती" असं विद्यार्थ्याने सांगितलं आहे.