Pune
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय आणि छुप्या घडामोडींना वेग आला आहे. मनपा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपचा त्यांच्याच सत्तेतील 'मित्राकडून' घात झाला होता, हे निकालाअंती स्पष्ट झाले होते.
आमदार रवि राणा यांनी बंधू सुनील राणा यांच्या विजयासाठी थेट महाविकास आघाडीच्या गोटात गुप्त 'फिल्डिंग' लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राणा यांनी चक्क काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी सलगी वाढविली आहे.
महापालिकेत 'त्या' दगाफटक्याची पुनरावृत्ती ?
महापालिका निवडणुकीत आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभूत करण्याची किमया केली होती. अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजप आणि 'वायएसपी' एकमेकांसमोर थेट शड्डू ठोकून लढले होते.
पाडापाडीच्या राजकारणाचा फटका बसल्यामुळेच भाजपला अवघ्या २५ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर युवा स्वाभिमानने मोठी झेप घेत १५ जागांवर विजय मिळविला होता. जरी सध्या महापालिकेत महायुतीची सत्ता असली आणि त्यात 'वायएसपी' सह अजित पवार गट सोबत असला, तरी निवडणुकीतील त्या दगाफटक्याची सल भाजप नेत्यांच्या मनात कायम आहे.
महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता टांगणीला
अमरावती लोकल बॉडी निवडणुकीत महायुतीची उमेदवारी प्रवीण पोटे पाटील यांनाच दिली जाईल, असे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन ते तीन जाहीर कार्यक्रमातून दिले आहेत. दोन टर्मची आमदारकी, राज्यमंत्रीपद, संघटनेवर मजबूत पकड या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
यापूर्वीची निवडणूक त्यांनी एकहाती जिंकली होती. तर दुसरीकडे भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वासोबतही त्यांची सलगी आहे. त्यामुळे पोटे पाटील यांना ही तिसऱ्यांदा महायुतीची उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार व शिंदेसेनेच्या स्थानिक नेतृत्वाशीदेखील त्यांची सलगी आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीची उत्सुकता टांगणीला लागली आहे.