पौड प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटामध्ये विकासकामांना नवी दिशा देत जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज यांनी राबवलेला “मुळशी पॅटर्न” सध्या तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे,
विशेषतः पाणी प्रश्नासारख्या गंभीर विषयावर त्यांनी स्वीकारलेली प्रत्यक्ष कामाची पद्धत नागरिकांच्या पसंतीस उतरली असून गावागावातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती, या पार्श्वभूमीवर फक्त बैठका किंवा आश्वासने न देता मिलिंद वाळंज यांनी थेट कृती आराखडा तयार केला. त्यांनी स्वतंत्र पथके नेमून ती गावागावात पाठवली, या पथकांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, नागरिकांशी चर्चा केली, पाण्याच्या अडचणी समजून घेतल्या तसेच विविध ठिकाणांचे फोटो व वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली.
यानंतर या सर्व माहितीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, हा अहवाल केवळ कागदावर न राहता मिलिंद वाळंज यांनी स्वतः प्रत्येक गावाची डीटेल माहिती घेत त्यावर पुढील नियोजन सुरू केले, गावागावात सभा आयोजित करून नागरिकांसमोर प्रश्न मांडले गेले आणि त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यात आली.
या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक ग्रामस्थांनी “पहिल्यांदाच एखादा लोकप्रतिनिधी आमच्या गावात येऊन आमचे प्रश्न प्रत्यक्ष समजून घेत आहे,” अशी भावना व्यक्त केली. त्यामुळेच “मुळशी पॅटर्न” हा केवळ राजकीय उपक्रम नसून लोकसहभागातून प्रश्न सोडवण्याचा नवा विकास मॉडेल म्हणून पुढे येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
“फक्त चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती” या भूमिकेतून काम करणारे मिलिंद वाळंज यांनी प्रशासन, अधिकारी आणि नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करून प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. गावपातळीवरील समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रत्येक गावातून स्वयंसेवक पुढे यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुळशी पॅटर्नची ताकद; मिलिंद वाळंज यांच्या सविस्तर सादरीकरणाने अधिकारीही चक्रावले
मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटामध्ये वाढत्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज यांनी राबवलेला “मुळशी पॅटर्न” आता प्रभावी ठरत असल्याचे आजच्या आढावा बैठकीत दिसून आले. गावागावातील पाणी समस्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल पाहून अधिकारी वर्गही चक्रावून गेला असल्याची चर्चा बैठकीनंतर सुरू होती.
या बैठकीस मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्यक्ष सर्वेक्षण, नागरिकांशी थेट संवाद, अभ्यासपूर्ण अहवाल आणि त्यावर तातडीने कृती… या चार सूत्रांवर आधारित मिलिंद वाळंज यांचा “मुळशी पॅटर्न” आता तालुक्यात विकासाच्या नव्या राजकारणाची दिशा ठरत असल्याचे बोलले जात आहे.