Pune
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवरून पक्षात वादंग सुरू झाल्याची चर्चा आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा समावेश नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती.
अशातच आता राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत तीन नव्या नावांचा समावेश होणार आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत (National Executive) लवकरच मोठे फेरबदल होणार असून, यात तीन नव्या प्रमुख नेत्यांचा समावेश केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. पक्षाचे तरुण नेते सूरज चव्हाण यांनी कालच पक्षाच्या संघटनात्मक बदलांबाबत मोठे संकेत दिले होते. त्यानंतर आता या तीन नावांची अधिकृत घोषणा होण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
या तीन नेत्यांना मिळणार संधी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी खासदार समीर भुजबळ, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्या नावांचा नव्याने समावेश केला जाणार आहे. आगामी राजकीय गणिते, पक्षाचा प्रादेशिक समतोल आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी या तिन्ही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
पटेल आणि तटकरेंचं काय होणार?
या नव्या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सध्याच्या भूमिकेत काही बदल होणार का, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनुसार, नव्या चेहऱ्यांचा समावेश हा पक्षाचा विस्तार करण्यासाठी केला जात असून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्थान आणि महत्त्व कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी पाठवलेल्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यानंतर ही तांत्रिक चूक असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. पटेल आणि तटकरे यांच्या नावाचा समावेश करण्याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता तीन नव्या नावांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नावाचा समावेश होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे