Punr
तमिळनाडूमधील 'कलैग्नर मगलिर उरिमाई थोगई' (Kalaignar Magalir Urimai Thogai) योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना मे महिन्याचा एक हजार रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (C Joseph Vijay) यांनी गुरुवारी केली
माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी (M Karunanidhi) यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना मागील डीएमके सरकारच्या काळात लागू करण्यात आली होती. या योजनेतील लाभाची रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
योजनेची पुनर्रचना करण्यासाठी सरकारला काही कालावधी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले. मात्र, महिलांचा लाभ खंडित होऊ नये यासाठी मे महिन्याचा हप्ता तातडीने जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने ६० वर्षांखालील महिलांना दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.