आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुनावळेतील मोक्याची ९१ गुंठे जागा 'स्थायी'कडून खासगी संस्थेच्या घशात? महापौर म्हणाले

शरद लाटे  62   15-05-2026 14:52:17

Pune -: 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची ९१ गुंठे जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडे तत्तावर देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी देत अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.

परंतु, या शाळा आरक्षणाच्या खासगीकरणाला सोसायटी फेडरेशनसह महापौर रवी लांडगे यांनीही विरोध दर्शविला आहे.

महापालिकेची पुनावळे येथे ९१ गुंठे जागा आहे. ताब्यात असलेल्या या जागेवर विकास आराखड्यात माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. ही जागा खासगी संस्थेला भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यात तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यांपैकी सात कोटी रुपयांचा मोबदला देणाऱ्या एका संस्थेला ९१ गुंठे जागा ३० वर्षांसाठी भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील सदस्यांचा विरोध डावलून हा विषय मंजूर करण्यात आला.

या शाळा आरक्षण खासगीकरणाला पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने विरोध दर्शविला आहे. शाळेच्या जागेचे खासगीकरण करुन ती अल्प मोबदल्यात भाडेतत्वार देणे चुकीचे आहे. पुनावळे परिसरातील वाढणारी लोकसंख्या पाहता येथे महापालिकेने सीबीएसई शाळा उभारावी अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली. जागा भाड्याने देण्याचा विषय प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

नितीन गडकरींना आली आईची आठवण; भावूक होत म्हणाले, "ती हयात असताना…"

जागेच्या मोबदल्यास संरक्षण विभागाला सदनिका

महापालिकेने संरक्षण विभागाचा जागा ताब्यात घेत पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक ३०, ३२, ३३, ३४, ३७, ३८ आणि ३९ येथे १८ मीटर रुंदीचे रस्ते विकसित केले आहेत. त्यासंदर्भात महाालिकेने संरक्षण विभागासोबत करार केला आहे. त्यानुसार जागेच्या बाजारभावानुसार असलेल्या मूल्याच्या बदल्यात महापालिका संरक्षण विभागास निवासी सदनिका बांधून देणार आहे. संरक्षण विभागाच्या खडकी येथील स्टेशन मुख्यालयाने घोरपडी, खडकी व औंध येथे निवासी सदनिका बांधून देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्याचा आराखडा तसेच, अंदाजपत्रक, बांधकाम परवानगी व निविदा प्रकिया याकामांसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या १.९३ टक्के शुल्क दराने सल्लागाराची थेट पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाची पुस्तिका मे महिन्यात छापणार

लेखा विभागासाठी सन २०२५-२६ चे सुधारित व सन २०२६-२७ ची मूळ अर्थसंकल्प पुस्तिका छापण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठादारांकडून दर मागविण्यात आले होते. आठ लाख ७४ हजार १०७ रुपये खर्च त्यासाठी केला जाणार आहे. अर्थसंकल्पाची पुस्तिका न छापल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन अखेर पुस्तिका मे महिन्यात छापण्याचा निर्णय लेखा विभागाने घेतला आहे.

पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; पण कोणती कामे अजूनही अपूर्ण ? केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली सविस्तर माहिती

मेट्रोचा विषय पुन्हा तहकूब

मेट्रोला ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा विषय पुन्हा तहकूब करण्यात आला आहे. महामेट्रोकडून निगडी ते चिंचवड दरम्यानचा सेवा रस्ता व्यवस्थित दुरूस्त करण्यात आला नाही. पुढील बैठकीत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. दुरूस्ती काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मेट्रो व्यवस्थापनाला पत्र देण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी सांगितले.

खासगीकरणाला माझा विरोध होता आणि राहील. पुनावळेतील शाळा आरक्षणाची जागा खासगी संस्थेला भाड्याने देण्याच्या विषयाची सविस्तर माहिती घेतली जाईल. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.