Beed
खास आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील नेकनूरमध्ये दोन गटात चांगलाच राडा झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली होती.
हरिनाम सप्ताहाच्या सांगतेवेळी अगदी किरकोळ कारणावरून हा वाद पेटला होता. मनोज जरांगे पाटील हे काल नेकनूर येथे आल्यानंतर त्यांनी सूचक इशारा दिला आहे. जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. आमच्यावर केसेस झाल्यानं काही फरक पडत नाही असा सूचक इशारा त्यांनी दिला. तर त्याचवेळी दोन्ही समाजाला त्यांनी मोठे आवाहनही केले आहे. दोन-चार लोकांसाठी सर्वांनाच यात दोषी धरू नये असे जरांगे पाटील म्हणाले.
जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या
सर्व समाजातील, धर्मातील लोकं ही गुण्यागोविंदानं नांदतात. एक दोन तसं वागतात. त्याची काळजी करायची नाही. आम्ही कशासाठी आहोत? आम्हाला दुसरं काही काम नाही. केसेस दाखल आहेत. आम्हाला काही नोकऱ्या लागणार नाही. होऊ द्या जे व्हायचं ते असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. पण सर्वांना दोषी धरायचं नाही. बाकीच्यांचा काही दोष नाही. दोन-चार लोकांसाठी सर्वांना यात दोषी करू नये असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.
नेकनूरमध्ये काय घडलं?
बीडच्या नेकनूरमध्ये हरिनाम सप्ताह सांगता सुरू असतानाच संध्याकाळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. चालकासह रिक्षातील महिलांना आणि लहान मुलाला मारहाण झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. थोड्याच वेळात दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. दोन्ही गट आमने-सामने आले. घटनेची माहिती समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला.
रिक्षा चालकाचा कट लागन्याने दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकातील या वादाचे दोन गटातील राड्यात रुपांतर झाले. काहींना मारहाण झाली. दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने समाजकंटकांवर कारवाई केली. शांतता भंग केल्याप्रकरणात पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला आणि 11 जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर दोन्ही समाजाने शांततेचे आवाहन केले आहे. शहरात शांतता आहे. मनोज जरांगे हे बंकटस्वामी संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमासाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केले.