Pune News
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पिंपरी चिंचवडमध्ये आज जे घडलं ते पाहून साक्षात भाजपचे नेतेही कपाळावर हात मारून घेत आहेत. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली खरी, पण उत्साहाच्या भरात त्यांनी चक्क स्वतःच्याच सरकारविरुद्ध घोषणाबाजी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात खसखस पिकली आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यामुळे या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा रंगली आहे. निमित्त होते महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनाचे, पण उत्साहाच्या भरात सत्ताधारी नेत्यांनी चक्क स्वतःच्याच सरकारचा निषेध नोंदवला. या 'चूक भूल' आंदोलनामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.
महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष्य करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षांनी निदर्शनांचे आयोजन केले होते. या आंदोलनात भाजप आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. भाजप सोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ही या आंदोलनात सहभागी झाले होते. एनडीएच्या घटक पक्षांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. यात काँग्रेसचा निषेध करणे अपेक्षित होते. पण झाले उलटेच. या सर्वांना आपल्याच सरकारला लक्ष्य केले.
आंदोलन रंगात आले असताना प्रशांत शितोळे यांनी "या सरकारचं करायचं काय?" अशी घोषणा दिली. त्यावर कार्यकर्त्यांनीही तितक्याच जोशात "खाली डोकं, वर पाय" म्हणत परिसर दणाणून सोडला. एकदा चूक झाल्यानंतर सावरण्याऐवजी, शितोळे यांनी पुन्हा एकदा "NDA सरकारचं करायचं काय?" असे विचारले, तरीही सर्वांनी पुन्हा तोच नारा लावला. केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता असताना आपण कोणा विरोधात घोषणा देतोय, हे लक्षात येताच नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आमदार उमा खापरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत विजयाच्या घोषणा देऊन वेळ मारून नेली. मात्र तोपर्यंत हा 'सेल्फ गोल' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
महापालिकेच्या परिसरात महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात निदर्शनं सुरू होती. यावेळी भाजप आमदार उमा खापरे आणि प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र, विरोधकांचे नाव घेण्याऐवजी प्रशांत शितोळे यांनी थेट 'NDA' सरकारविरोधातच घोषणा सुरू केल्या. "NDA सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सत्ता आपलीच आहे आणि आपण केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करतोय हे जेव्हा नेत्यांच्या लक्षात आले, तेव्हा एकच धावपळ उडाली. आमदार खापरेंनी तातडीने "NDA चा विजय असो" अशा घोषणा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. सध्या पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळात या 'सेल्फ गोल'ची चांगलीच चर्चा रंगली आहे.