पीपीपीद्वारे विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले जातात. त्याबदल्यात क्रेडीट नोटद्वारे त्याचा मोबदला दिला जातो. पीपीपीवर शहरात रस्त्यांचे कामे केवळ २० ते ३० टक्के झालेली असताना त्याबदल्यात बिल्डरांना तब्बल ८० टक्के क्रेडिट नोट जास्त खर्ची केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पण हे रस्ते कोणते याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली नाही.
विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे (पीपीपी) काम केले जात आहे. त्याबदल्यात ठेकेदाराला थेट पैसे न देता क्रेडीट नोट दिली जाते. ही क्रेडीट नोट मिळकतकर भरणे, बांधकाम विकास शुल्क भरणे यासह अन्य पद्धतीने खर्ची पाडला जातो. त्यासाठी महापालिकेकडून भूसंपादन लवकर होणे आवश्यक आहे. शहरात सुमारे १९ कामे सुरु असून, त्यांची किंमत ९६० कोटी ते १ हजार कोटी इतकी आहे.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पीपीपीच्या रस्त्यांचा विषय बैठकीमध्ये उपस्थित केला. माझ्याकडे पीपीपीच्या रस्त्यांची माहिती आली आहे. त्यात कामे २० ते ३० टक्के झाली आहेत आणि क्रेडिटनोट ८० टक्क्यापर्यंत खर्ची पडलेली आहे. अनेक रस्त्यांची कामे का रखडली आहेत? असा प्रश्न प्रशासनाला केला. त्यावर समाधानकारक उत्तर न देता आल्याने यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे.
'पीपीपीच्या रस्त्यांची कामे होत नसल्याची माझी माहिती आहे. या प्रकल्पांची मी जागा पाहणी करून पुढील कारवाई करणार आहे असे भिमाले यांनी सांगितले. मात्र, कोणत्या भागातील रस्त्यांची कामे रखडली आहेत ही माहिती भिमाले यांनी दिली नाही.