आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना जाहीर; 'या' तारखेपर्यंत घेता येणार हरकत

शरद लाटे  145   16-04-2026 09:42:04

Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना जाहीर; 'या' तारखेपर्यंत घेता येणार हरकत

हिंजवडी प्रतिनिधी - 

Panchayat Election -ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींच्या वॉर्ड रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर केला असून नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत सूचना व हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.

लोणी काळभोर तहसील कार्यालयाअंतर्गत पूर्व हवेलीतील 27 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

राज्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वॉर्ड रचना निश्चित करण्याचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 20 फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून नव्याने निश्चित केलेल्या हद्दींनुसार वॉर्ड रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप रचनेवर प्राप्त होणार्‍या हरकती व सूचनांवर 21 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे.

त्यानंतर प्रस्तावांची पडताळणी पूर्ण करून जिल्हाधिकारी 28 एप्रिलपर्यंत अंतिम वॉर्ड रचना राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करतील. पुढे 4 मे रोजी अंतिम वॉर्ड रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांनी प्रारूप वॉर्ड रचनेचा अभ्यास करून वेळेत हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायती
लोणी काळभोर तहसील कार्यालयाअंतर्गत वॉर्ड रचना जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वळती, वढू खुर्द, उरुळी कांचन, थेऊर, तुळापूर, तरडे, सोरतापवाडी, सांगवी सांडस, शिंदेवाडी, शिंदवणे, शिरसवडी, प्रयागधाम, पेठ, न्हावी सांडस, नायगाव, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ, केसनंद, हिंगणगाव, डोंगरगाव, भावडी, भवरापूर, बिवरी, बकोरी, आळंदी म्हातोबाची आणि अष्टापूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.