नगरसेवक कुंदन गायकवाड, निलेश नेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
चिखली येथील घरकुल प्रकल्प परिसरात पोलीस स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली असून, नगरसेवक कुंदन गायकवाड आणि नगरसेवक निलेश नेवाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत JnNURM योजनेअंतर्गत चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) उभारण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पामध्ये सुमारे ३० हजार नागरिक वास्तव्यास आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशनची आवश्यकता व्यक्त केली जात होती.
यासाठी घरकुल प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराशेजारील मनपा मालकीच्या सुमारे १५ गुंठे मोकळ्या जागेवर चिखली पोलीस स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक कुंदन गायकवाड आणि निलेश नेवाळे यांनी सातत्याने मांडला होता. संबंधित विभागाकडूनही या मागणीस सकारात्मक शिफारस करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रस्तावास स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाल्याने आता पोलीस स्टेशन उभारणीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. या निर्णयामुळे चिखली घरकुल प्रकल्प तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, नगरसेवकांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील स्थानिक नगरसेविका रिटा सानप आणि नगरसेविका योगीता नागरगोजे यांनीसुद्धा पोलीस स्टेशनच्या जागेसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
“चिखली घरकुल परिसरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार निर्माण होणारे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन होणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि स्थायी समितीने मंजुरी दिल्याचा आनंद आहे. या निर्णयामुळे नागरिकांची सुरक्षितता अधिक बळकट होईल.
– कुंदन गायकवाड, नगरसेवक, भाजपा.
“चिखली परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनची मागणी आम्ही सातत्याने लावून धरली होती. स्थायी समितीच्या मंजुरीमुळे आता या कामाला गती मिळणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि भविष्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राहील.
– निलेश नेवाळे, नगरसेवक, भाजपा.