Pune
सोसायट्यांच्या पुनर्विकासाला नव्या नियमांची खिळ बसली असून, महापालिकेने पुनर्विकासासंबंधात नवीन नियमांचा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात अटींची जंत्रीच टाकली असून, त्याची पूर्तता करता करता विकसकाच्या नाकीनऊ येणार आहेत.
हे परिपत्रक महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी काढले आहे. शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकसन करून नव्याने इमारती उभारण्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर महापालिकेत दाखल होत आहेत.
परिणामी शहराच्या अनेक भागात जुन्या इमारतींचे पाडकाम सुरू आहे. मात्र, आता पाडकाम कशा पद्धतीने करावे, यासाठी राम यांनी हे परिपत्रक काढले आहे. जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात त्या इमारतीच्या पाडकामासंदर्भातील कार्यपद्धती महापालिकेकडून प्रथमच निश्चित करण्यात आली आहे. यामधील नियम आणि अटी पाहिल्यास नवी इमारत बांधणे तर दूरच; पण अस्तित्त्वात असलेली इमारत पाडताना सोसायटीधारक आणि विकसकाच्या नाकीनऊ येणार असल्याचे या नियमावलीवरून दिसून येते.
सुरक्षेच्या कारणास्तव ही नियमावली तयार केली असली, तरी तिची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना दमछाक होणार, हे निश्चित! नव्या कार्यपद्धतीत पाडकाम करण्यापूर्वी इमारतीच्या आजूबाजूस असलेल्या सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांचे पत्ते, फोन नंबर, नजीकचे अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे, महावितरण आणि एमएजनसीएल यांचे कार्यालयीन पत्ते, अधिकाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांकांची यादी, महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभाग,
पाणीपुरवठा विभाग यांचे पाडकाम करण्यासाठी सुरक्षिततेबाबतचे नाहरकत पत्र आदी अटी बंधनकारक केल्या आहेत. विशेष म्हणजे तुमच्या सोसायटीच्या पाडकामामुळे जर शेजारील इमारतीस धोका होणार असेल, तर त्या इमारतीतील सर्व रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागणार आहे. म्हणजे ती इमारत पूर्णतः रिकामी करावी लागणार आहे. साहजिकच तेथील रहिवाशांची वेगळीकडे राहण्याची सोय पुनर्विकास होणाऱ्या सोसायटीला किंवा विकसकाला करावी लागणार आहे.
जर कोणी तयारच झाले नाही तर काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या परिपत्रकानुसार पाडकामासाठी करायच्या अर्जासोबत सोसायटीचा सर्वसाधारण सभेचा ठराव, बांधकाम परवानगी, विकासकासोबतचा करारनामा, इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ही कायदेशीर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेतच; याशिवाय स्ट्रक्चरल इंजिनिअरचा परवाना, इमारतीचा ऑडिट रिपोर्ट, आजूबाजूच्या सोसायट्या आणि रस्त्यांचे स्केच तयार करून घेऊन ते सादर करावे लागणार आहेत.
टप्पेनिहाय आराखडा बंधनकारक
पाडकाम सुरू करण्यापूर्वी त्याचा टप्पेनिहाय आराखडा तयार करून महापालिकेचा बांधकाम विभाग, पोलीस, अग्निशामक दलास कळविणे या आदेशाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे. पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याच्या विल्हेवाटीबद्दल माहितीही महापालिकेला सादर करावी लागणार आहे. पाडकामाचे टप्पेनिहाय छायाचित्र काढून ते महापालिकेकडे वेळोवेळी सादर करणेही नव्या नियमावलीनुसार बंधनकारक केले आहे.