आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड

शरद लाटे  139   10-04-2026 09:20:17

Pune 

राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. साधारण ४ वर्षांपूर्वी आमदारांच्या बंडाने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचे बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच्या खासदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यातच बुधवारी रात्री ठाण्यात झालेल्या एका अत्यंत गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मोठ्या घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे तातडीने मूळ गावी दरे येथे गेले आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ठाण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

सध्या शिवसेना ठाकरे गटाचे ९ खासदार आहेत. या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यातच आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ८ खासदारांशी थेट संपर्क साधला आहे. यानंतर ठाण्यात एक गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. ठाण्यातील एका गुप्त ठिकाणी ही बैठक पार पडली. या बैठकीला ६ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित २ खासदारांनी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चेत सहभाग घेतला.

कोणकोणते खासदार फुटणार?

या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओम राजेनिंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव हे खासदार उपस्थित असल्याचे बोललं जात आहे. या सर्व खासदारांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळतील, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेतून सुमारे ४० आमदारांसह नाट्यमय बंड केल्यानंतर आता ४ वर्षांनी एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे.

ठाण्यातील या खळबळजनक भेटीगाठींनंतर एकनाथ शिंदे गुरुवारी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचले आहेत. वरकरणी हा दौरा स्थानिक विकासकामांचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या राजकीय खेळीपूर्वी हा मुक्काम असल्याचे बोललं जात आहे. तसेच काही जण याला वादळापूर्वीची शांतता असल्याचे म्हणत आहेत.

एकनाथ शिंदे येथे काही दिवस वास्तव्य करणार असून ग्रामस्थांशी संवाद साधण्यासोबतच प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. या दोन्ही घडामोडींमुळे राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील ही संभाव्य गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता मातोश्रीसमोर उभे राहिले आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.