Pune
राज्यातील कल्पक आणि उच्चशिक्षित तरुणांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी 'मुख्यमंत्री फेलोशिप २०२६' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामुळे तरुणांना थेट मंत्रालयातील धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
तरुणांना प्रशासनात काम करण्याची सुवर्णसंधी
या फेलोशिपच्या माध्यमातून निवड झालेल्या तरुणांना मंत्रालयात प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. सरकारी यंत्रणेत तरुणांची ऊर्जा, नवकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
६० जागांसाठी भरती, महिलांसाठी आरक्षण
या कार्यक्रमांतर्गत एकूण ६० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.
आयआयटी मुंबईसोबत अभ्यासाची संधी
निवड झालेल्या उमेदवारांना केवळ कामाचा अनुभवच मिळणार नाही, तर आयआयटी मुंबईच्या सहकार्याने 'सार्वजनिक धोरण' विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधीही मिळणार आहे.
आकर्षक मानधन आणि अधिकाऱ्याचा दर्जा
या फेलोशिपसाठी निवड झालेल्या तरुणांना दरमहा ६१,५०० रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. तसेच त्यांना राजपत्रित गट-अ अधिकाऱ्याचा दर्जा मिळणार आहे, ज्यामुळे या कार्यक्रमाचे आकर्षण अधिक वाढले आहे.
भविष्यातील नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न
एक वर्षांच्या कालावधीत तरुणांना प्रशासनातील विविध बाबींचा सखोल अनुभव मिळणार आहे. या उपक्रमातून भविष्यात सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व तयार होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तुम्ही देखील वेळ न घालता यासाठी अर्ज करा.