आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट;

नितीन देशपांडे   114   06-04-2026 17:49:47

Pune Pashan link road : पुणे: शहरातील बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

सुमारे 1.2 किमी लांबीच्या या रस्त्यातील केवळ 200 मीटरचा भाग भूसंपादनाच्या अडचणीमुळे तब्बल 33 वर्षांपासून प्रलंबित होता. आता महापालिकेकडून या उर्वरित कामासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचा प्रस्ताव प्रथम 1992 मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, भूसंपादनातील अडचणींमुळे कामाचा वेग कमी झाला. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभारले गेल्याने वाहतूक वाढली आणि या रस्त्याची गरज अधिक तीव्र झाली.

या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांनीही पाठपुरावा केला. 2021 मध्ये 'बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट'ने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेला काम पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळापत्रक देण्याचे आदेश दिले. तरीही विलंब झाल्याने एप्रिल 2025 मध्ये अधिक कडक निर्देश देण्यात आले.

महापालिका प्रशासनाने भूसंपादनासाठी सुमारे 25 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. हा रस्ता शहरातील महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक'पैकी एक मानला जातो. चालू वर्षात पूर्ण होणाऱ्या 12 रस्त्यांमध्ये याचा समावेश आहे.

जमीन ताब्यात मिळाल्यानंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असून, हा रस्ता सुरू झाल्यानंतर बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.