ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे पुण्यात पूरस्थिती; करदात्यांचा पैसा वाया – नगरसेवक सुहास टिंगरे
सभागृहाची दिशाभूल; कंपनीला नेमकं वाचवतोय कोण?
पुणे प्रतिनिधी : कोट्यवधी रुपये खर्च करून ‘स्मार्ट सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या पुण्याची सोमवारी (दि. ३०) अवघ्या काही मिनिटांच्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पोलखोल केली. दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वाहतूक ठप्प झाली. परिणामी पुणेकरांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला.
वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मार्च महिना संपत आला तरी पावसाळापूर्व साफसफाई न झाल्याने महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुहास टिंगरे यांनी प्रशासन व ठेकेदारांवर जोरदार टीका करत म्हटले की, “महापालिकेच्या आश्रयावर काही ठेकेदार वर्षानुवर्षे पोसले गेले आहेत. प्रत्यक्ष कामाऐवजी केवळ बिले उचलण्याचे प्रकार सुरू असल्यानेच पुण्यात पूरस्थिती निर्माण होत आहे.”
दोन वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर २२ ठिकाणी तातडीच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. ही कामे एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली होती. मात्र, २२ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली असून प्रत्यक्षात फक्त २ कामे सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले.
❗ सभागृहाची दिशाभूल
या प्रकरणी महापालिकेच्या सभागृहात चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. “या कंपनीला नेमकं वाचवतोय कोण?” असा सवालही टिंगरे यांनी उपस्थित केला.
⚠️ ठेकेदारांना मेहरबानी?
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील निविदा प्रक्रियेत काही ठराविक ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. शहरातील २२७ ठिकाणांपैकी १२० गंभीर ठिकाणी तातडीने काम करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काम सुरू नसल्याची स्थिती आहे.
“प्रशासन ठेकेदारांना संभाळण्यात व्यस्त असून करदात्यांचा पैसा वाया जात आहे,” अशी सणसणीत टीका स्थायी समितीचे सदस्य तथा नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केली.