आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune ZP Committee Chairman Election: पुणे जिल्हा परिषदेत सभापतीपदासाठी नावे निश्चित

शरद लाटे  314   02-04-2026 14:07:23

Pune 

जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी अखेर मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, ऐनवेळी बारामतीसह खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा पत्ता कट झाला आहे.

मावळच्या दीपाली हुलावळे, वेल्हेच्या अमोल नलावडे, इंदापूरच्या अंकिता पाटील आणि हवेलीच्या जितेंद्र बढेकर यांना सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकिट उघडून ही नावे जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, गटनेते श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जाहीर झालेल्या नावांवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांच्यात बांधकाम व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन या दोन महत्त्वाच्या समित्यांचे वाटप होणार असून, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अंकिता पाटील आणि समाजकल्याण समिती सभापतीपदी जितेंद्र बढेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. चारही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, भोरचे विक्रम खुटवड यांनी सभापतीपद नाकारल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी अमोल नलावडे यांना संधी देण्यात आली. तसेच, आमदारांनी काही तालुक्यांना संधी देऊ नये अशी केलेली मागणीही फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांचा प्रभाव वाढला असून, बारामतीऐवजी इंदापूरने बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.