Pune
फर्ग्युसन कॉलेज (FC) रोडवर एक रक्तरंजित थरार बघायला मिळाला आहे. इथं एका तरुणाने स्वत:वर ब्लेडने वार केले आहेत. भरगर्दीत तरुणाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. घडलेला हा प्रकार बघून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पुढील तपास केला जात आहे.
नेमका प्रकार काय?
आदित्य सातपुते (वय ४१) असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आहे. सध्या तो पुण्यातील भोसले नगर भागात वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यची काही दिवसांपूर्वी नोकरी गेली होती, ज्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. शनिवारी रात्री जेव्हा एफसी रोडवर तरुणाईची मोठी गर्दी असते, तेव्हा अचानक आदित्यने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने गंभीर वार केले.
भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. खाऊ गल्लीतील दुकानदार आणि नागरिक या घटनेने पुरते हादरून गेले होते. घटनेचं गांभीर्य ओळखून आजूबाजूला असलेल्या सजग नागरिकांनी तात्काळ धाव घेत आदित्यला मदत केली. त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
बेरोजगारी आणि मानसिक आरोग्य
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आदित्य गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमागे नोकरीव्यतिरिक्त इतर काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणं आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.