Pune Municipal Corporation Decision: पुणे महानगरपालिकेने शहरातील घरांना करसवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या महिलांच्या नावावर असलेल्या घरांना ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाने महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी वाढण्यास चालना मिळणार आहे. महिलांना करमाफीचा निर्णय दिला असला, तरी भाजपने महापालिका निवडणुकीवेळी सरसकट पाचशे स्क्वेअर फूट घरांना मिळकत करमाफीचा दिलेला शब्द फिरवल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
विरोधकांची होती तयारी, मात्र...
गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचीत नगरसेवकांची पहिली स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर ५०० फुटापर्यंतच्या घरांचा मिळकतकर माफ करावा, असा ठराव काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी दिला होता. महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपसह सर्वच पक्षांनी ५०० फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या बैठकीत या प्रस्तावाला कोणीही विरोध केला नाही. तसेच प्रशासनाकडूनही करमाफी करण्याबाबत या बैठकीत कोणतीही हरकत घेतली गेली नाही. पण भाजपच्या सदस्यांनी करमाफी करणे शक्य आहे का याचा अभिप्राय प्रशासनाकडे मागितला आहे. हा अभिप्राय आल्यानंतर यावर निर्णय घेऊ असे सांगून हा प्रस्ताव पुढे ढकलला. त्यामुळे पहिल्या बैठकीत करमाफीचा निर्णय होऊ शकला नव्हता.