आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा

नितीन देशपांडे   128   20-03-2026 22:13:43

Pune news नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची छायचित्रे समाज माध्यमात व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडचणीत सापडला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी रुपाली चाकरणकरांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात पक्षावर टीका होऊ लागल्याने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेनंतर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रुपाली चाकणकर या अशोक खरात याच्या डोक्यावर छत्री धरताना आणि त्यांचे पाय धुताना दिसत आहेत. त्यामुळे महिला आयोगासारख्या जबाबदार पदावर असताना एका भोंदूबाबाच्या प्रभावाखाली राहून अंधश्रद्धेचे दर्शन घडवणे हे पदाला शोभणारे नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षाच जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत जोडल्या गेल्या असतील, तर त्या पीडितांना न्याय कसा देणार? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे. याचपार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. महत्त्वाचे म्हणजे अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीस यांनी चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता रुपाली चाकणकर यांनी अजित पवार गटाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

सविस्तर बातमी लवकरच


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.