Beed अवैध वाळू वाहतुकीसाठी 'पर डे' (दिवसाचा हप्ता) मोजणाऱ्या पोलीस प्रशासनातील भ्रष्ट चेहऱ्यांचा बुरखा बीड एसीबीने फाडला आहे. वाळूची वाहने बिनदिक्कत सोडून देण्यासाठी दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चकलांबा पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे वाळूचे वाहन विनाअडथळा चालू देण्यासाठी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी महिन्याकाठी ६० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.
असा रचला सापळ
तक्रारदाराने या भ्रष्टाचाराबाबत बीड एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार, मंगळवारी (दि. १०) रात्री १० वाजेच्या सुमारास उमापूर पोलीस चौकीत सापळा रचण्यात आला. लाचेची ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कर्मचारी विनोद सुरवसे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तपासात यामागे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. वाळू माफियांना अभय देणाऱ्या आणि वर्दीला कलंक लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सध्या दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महत्त्वाची माहिती:
लाचेची रक्कम: ५०,००० रुपये (तडजोडीनंतर).
कारवाईचे ठिकाण: उमापूर पोलीस चौकी.
दोषी: पो.नि. संदीप पाटील (प्रभारी, चकलांबा ठाणे) आणि विनोद सुरवसे (पोलीस कर्मचारी).
कोणाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई: एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले व त्यांचे पथक.