Pune
महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान करून त्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
तसेच या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनीं आक्रमर भूमिका घेतली होती. तसेच संबंधित मुलीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच भाजपाची पदाधिकारी असलेल्या या मुलीच्या आईकडून पक्षाने पदाचा राजीनामा घेतला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजपाच्या बदलापूर पूर्वमधील महिला आघाडी असलेल्या प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं होतं. तसेच त्या रीलमध्ये श्रीरामांबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. हे रील व्हायरल झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून बदलापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच या वक्तव्याविरोधात बदलापूर पूर्वमधील खरवई परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मुलीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर भाजपाने मृणाल जाधव हिची आई आणि पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या प्रतिभा जाधव यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला आहे. तसेच त्यांना पक्षामधून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपाने प्रसिद्धी पत्रकामधून दिली आहे. दरम्यान, प्रतिभा जाधव आणि त्यांचे पती महेश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत भावनिक प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला.
दरम्यान, भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्षांच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे, असे चित्रा वाघ यंनी म्हटले आहे.