Beed जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले असताना आणखी एक वादग्रस्त घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
अशातच मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गोविंद फड यांच्या फेसबुक पोस्टने बीडमध्ये मोठी खळबळ उडवली आहे.
गोविंद फड यांनी फेसबुकवर इंग्रजीत पोस्ट करत "धनंजय मुंडेंच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय," असा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी थेट सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांची नावे घेतल्याने हा वाद अधिक चिघळला आहे.
गोविंद फड हे परळी बाजार समितीचे माजी सभापती असून धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी अशी आक्रमक भाषा का वापरली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अशा विविध विषयांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर फड यांच्या पोस्टमुळे वातावरण आणखी तापले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या वक्तव्याला खुले आव्हान मानत टीका केली आहे, तर मुंडे समर्थकांनी फड यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.