अजित पवारांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
मात्र या निर्णयानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राष्ट्रवादी नेत्यांची कुजबुज कॅमेऱ्यात कैद झाली.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतर सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेसाठी सर्व माध्यमांचे कॅमेरे लावण्यात आले होते. सुनेत्रा पवार येण्यापूर्वी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी माईकजवळ राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते. हे नेते आपसांत कुजबुज करत होते. या नेत्यांमध्ये जे काही ठरले होते. तसेच पत्रकार परिषदेत घडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना न बोलताच जायला सांगितले. या घटनेचा व्हिडिओ टीव्ही ९ वृत्वाहिनीने प्रसारित केला आहे.
नेमकं व्हिडिओत काय?
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मंचाजवळ सतीश चव्हाण, सरोज अहिरे आणि आनंद परांजपे उपस्थित होते. यावेळी सतीश चव्हाण यांनी मला माहिती होतं आधीच.. त्यावर सरोज अहिरे यांनी दादांजवळ कधी जाऊ देण्याची संधी नाही दिली माणसांनी, वहिनींजवळ तरी जाऊ द्या...त्यापुढे आनंद परांजपे सांगतात की, तुम्ही प्रश्न नका घेऊ, तुमचं बोलून झालं की निघा, त्यानंतर सतीश चव्हाण यांनी हा...हे चांगले केलं...स्पेशली प्रश्न करू नका म्हणा असं म्हटलं. त्या मनस्थितीत नाही, बोलायचे आपले आणि उठायचे..असं आनंद परांजपे यांनी सांगितले. तर हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना..असं सरोज अहिरे यांनी विचारले. त्यावर सतीश चव्हाण यांनी प्रेशराईज करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही इथं बाजूला थांबू असं त्यांनी आनंद परांजपे यांना सांगितले. त्यानंतर या नेत्यांना बोलू नका, माईक सुरू आहे असं सांगितल्यानंतर ते गप्प बसले.
विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या आधी जी चर्चा सुरू होती तेच पत्रकार परिषदेत घडले. प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले. तेव्हा सतीश चव्हाण यांनी सुनेत्रा पवारांना तुमचे स्टेटमेंट तुम्ही करा असं म्हटले. त्यावर त्याच्या पलीकडे आम्ही बोलू असं प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला असता तटकरे-पटेल आणि सुनेत्रा पवार तिघेही जागेवरून उठले. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी तुम्ही निघा असं सुनेत्रा पवारांना सांगितल्याचे ऐकायला आले. त्यानंतर सुनेत्रा पवार निघून गेल्या आणि पटेल-तटकरे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला.