राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं.
अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण अधिवेशन काळात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांकडे खाते दिले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच
राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे. यंदाचा अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होणार
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. यामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना आमदार उजाळा देतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.