पुणे : लॉजवर नेण्याचे आमिष दाखवत डोंगरावर नेऊन ४० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
शफिया सलीम शेख (वय ४०, रा. दांडेकर पूल) असे मृत महिलेचे नाव आहे. १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी येथील एका क्रशर खाणीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शफिया या कोंढवा परिसरातील कान्हा चौकात उभ्या होत्या. त्यावेळी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी त्यांना लॉजवर नेण्याचे सांगितले. मात्र त्यांना कात्रजऐवजी मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. काही वेळाने महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०) हेही तेथे पोहोचले.
डोंगरावर मद्यपान करत असताना लॉजवर न आणल्याबाबत शफिया यांनी प्रश्न उपस्थित केला. यावरून वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे ५० ते ५५ फूट खोल खाणीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.