आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

डोणजे येथे एकल महिला सक्षमीकरण शिबिर उत्साहात संपन्न

नितीन देशपांडे   13   16-12-2025 20:51:34

Pune - डोणजे : एकल महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी व आर्थिक सक्षमतेसाठी आयोजित करण्यात आलेले एकल महिला सक्षमीकरण शिबिर आज डोणजे ग्रामपंचायत हॉल येथे यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये एकल महिलांना विविध शासकीय योजना, त्यांचे लाभ व अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ३.०० या वेळेत झालेल्या या शिबिरात डोणजे, सांबरेवाडी, थोपटेवाडी (घेरा), आतकरवाडी, मणेरवाडी, घेरासिंहगड, गोर्हे खुर्द व गोर्हे बुद्रूक या गावांतील एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी डोणजेच्या सरपंच सौ. स्नेहल वाल्हेकर म्हणाल्या, “एकल महिलांना शासकीय योजनांची योग्य माहिती व लाभ मिळाल्यास त्या आत्मनिर्भर होतील. अशा शिबिरांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण होते.”

महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती, जिल्हा परिषद पुणे सौ. पूजा नवनाथ पारगे म्हणाल्या, “एकल महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र माहितीअभावी त्या वंचित राहतात. अशा उपक्रमांतून महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे गरजेचे आहे.”

डोणजेचे उपसरपंच शेखर पारणे यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले, “ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकल महिलांसाठी अधिकाधिक उपक्रम राबवून त्यांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.”

शिबिरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, नमो शेतकरी महा सन्मान निधी, मनोधैर्य योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, पिंक ई-रिक्षा योजना, सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार अनुदान योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) तसेच विधवा पेन्शन योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली.य यावेळी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

डोणजे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे एकल महिलांकडून स्वागत करण्यात आले असून, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.