Pune news
महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल सोमवारी (दि. १५) वाजले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, सुमारे पावणे नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची मागील निवडणूक २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली आहे. आता निवडणूक जाहीर झाली असून, बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक राबविली जाणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. प्रत्येक उमेदवारासाठी १३ लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असणार आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात एकूण मतदारांची संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ५ हजार ७२८, तर स्त्री मतदार ८ लाख ७ हजार ९६६ आहेत. इतर मतदारांची संख्या १९७ आहे. निवडणुकीसाठी २०४४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.