पिंपरी : चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत (मोका) कारवाई केली आहे. या टोळीसह चिखलीमधील अनिरुद्ध जाधव, एमआयडीसी भोसरीमधील राहुल लोहार, दिघीमधील विक्रांत देवकुळे या टोळ्यांवर देखील मोकाची कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चालू वर्षात ३५ गुन्हेगारी टोळ्यांमधील १७९ गुन्हेगारांवर मोकाची कारवाई केली आहे.
चऱ्होली येथे आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तर सातवा साथीदार माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा मास्टर माईंड असल्याचे सांगितले जात आहे. दिघी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या सात जणांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील आरोपींवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख अमित जीवन पठारे (वय ३३, चऱ्होली बुद्रुक), विक्रांत सुरेश ठाकूर (वय ३८, सोळू, खेड), सुमित फुलचंद पटेल (वय ३१, दिघी), आकाश सोमनाथ पाठारे (वय २३, चऱ्होली बुद्रुक), सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय २४, सोळू, खेड), किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर (चऱ्होली बुद्रुक) अशी कारवाई झालेल्या टोळीची नावे आहेत.
दिघी पोलिसांनी आणखी एका टोळीवर मोकाचा प्रस्ताव पाठवला. टोळी प्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय २४), सुरज राजू चव्हाण (वय २०), साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट (वय १९), शुभम सुमित डिंगीया (वय २४, सर्व रा. बोपखेल) या टोळीवर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांनी मोकाचा पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून विक्रांत देवकुळे टोळीवर देखील कारवाई झाली आहे.
चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव याच्या टोळीवर देखील मोका लावण्यात आला आहे. टोळीप्रमुख विकी जाधव याच्यासह सोहन राजू चंदेलिया (वय २३, रावेत), प्रद्युम्न राजकुमार जवळगे (वय २५, चाकण), यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे (वय २१, निगडी), अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (वय २२, चिंचवड), शुभम गोरखनाथ चव्हाण (वय ३०, आकुर्डी), अनिकेत अशोक बाराथे (वय २७, दापोडी), अश्विन सुधीर गायकवाड (वय २१, दापोडी), यशपालसिंग अरविंद सिंग देवडा (वय १९, सांगवी) आणि पाच अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील सदस्यांवर तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार टोळीप्रमुख राहुल अप्पासाहेब लोहार (वय २७, उरुळी कांचन), टोळीतील सदस्य हृतिक प्रकाश गायकवाड (वय २४, चाकण), आकाश दिनकर गायकवाड (वय २४, मोशी), गणेश बबन वहिले (वय २३, डुडुळगाव, पुणे), शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४, डुडुळगाव) यांच्या विरोधात १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर देखील मोकाची कारवाई करण्यात आली आहे.
मोकाची कारवाई झालेल्या चार टोळ्यांमधील आरोपींवर चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, दिघी, हिंजवडी, दिघी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तमनगर पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, अमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.