आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

छोटे भूखंड विनाशुल्क नियमित होणार; लाखो मालमत्ताधारकांना होणार लाभ;

शरद लाटे  150   19-11-2025 09:17:58

Pune 

तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्याची कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केले आहे. यानुसार आता २० गुंठ्यांच्या आतील सर्व छोट्या भूखंडांचे व्यवहार नियमित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

१५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना लागू असणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख नोंदणी माननीय शिक्षकांसह विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात कार्यपद्धतीसंदर्भातील पत्र पाठविण्यात झाले आहे. ३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील राजपत्र जारी करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांसारख्या नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील निवासी/वाणिज्यिक झोन, छावणी क्षेत्रातील जमिनी, प्रादेशिक आराखड्यात अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्रे आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे (पेरीफेरल एरिया) क्षेत्र यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

सातबाऱ्यावर नाव लागणार

अनेकदा गुंठेवारीने घेतलेल्या जमिनींची नोंद ‘तुकडेबंदी’ कायद्यामुळे सातबारा उताऱ्यावर होत नव्हती किंवा झाल्यास ती ‘इतर हक्कात’ होत असे. जर यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल, तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदीदाराचे नाव कब्जेदार म्हणून लावले जाईल. ज्यांचे नाव सध्या सातबाराच्या ‘इतर हक्कात’ आहे, त्यांचे नाव आता मुख्य ‘कब्जेदार’ सदरात घेतले जाईल. 'तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार' असा जर काही शेरा सातबाऱ्यावर असेल, तर तो काढून टाकण्यात येणार आहे. ज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले आहेत आणि दस्त नोंदणीकृत नाहीत, अशा नागरिकांना तलाठी व मंडळ अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतील. मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्यानंतर त्यांचीही नावे सातबारावर लावली जातील.

दंड भरावा लागणणार नाही – बावनकुळे

तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती, नंतर ती ५ टक्के करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक पुढे येत नसल्याने आता शासनाने कोणतेही मूल्य न आकारता हे व्यवहार नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा ६० लाख कुटुंबे म्हणजेच राज्यातील सुमारे ३ कोटी नागरिकांना लाभ होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.