जालना (Jalana) स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत असल्याने एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी सिंघम स्टाईल लाथ मारल्याचे समोर आलं आहे.
एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत असल्याचा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.
आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असतानाच डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याच पहायला मिळालं आहे.