पुणे- माजी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही मलबार हिलमधील सातपुडा हा शासकीय बंगला रिकामा केलेला नाही.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना आतापर्यंत तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. तसेच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते. आता याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईत स्वतःचे आलिशान घर असल्याचा प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या नावावर गिरगाव चौपाटीतील एन. एस. पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीने हे घर १६ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले होते. धनंजय मुंडे यांचे मुंबईतील घर वीरभवन इमारतीत 9 व्या मजल्यावर आहे. 902 असा या घराचा क्रमांक आहे.
धनंजय मुंडेंचे हे घर तब्बल 2 हजार 151 चौरस फुटांचे आहे. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतः यासाठी 10 कोटी रुपये खर्च केला होता. या घरात सध्या कोणीही राहत नाही. ते घर खरेदी केल्यापासूनच बंद आहे, अशी माहिती विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.