Pune Kabutar Khana: गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. कोर्टाने बंदी आणली असताना जैन समुदायाने या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय देत कबुतरखाने बंद ठेवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
पुण्यातील एका घटनेमुळे यातील धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांच्या मुलीचा कबुतरामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर ते याबाबत जनजागृती करत आहेत.
शाम मानकर यांची मुलगी शीतल विजय शिंदे या १९ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. खरंतर कुटुंबियांना वाटले की, त्या बऱ्या होऊन घरी येतील. मात्र त्या आल्याच नाहीत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. कबुतराच्या विष्ठेमुळे फुफ्फुसातील फायब्रोसिस हा आजार त्यांना झाला होता. याबद्दल आता शाम मानकर आता जनजागृती करत असल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली.
शाम मानकर म्हणाले, २०१७ पासून माझी मुलगी आजारी पडू लागली. तिला सतत खोकला येत होता. आम्ही स्थानिक डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवले. पण खोकला थांबतच नव्हता. त्यामुळे आम्ही दुसऱ्या डॉक्टरला दाखवले. त्यांनी म्हटले की, तुम्ही जिथे राहता तिथे कबुतरे आहेत का? शीतल जिथे राहत होती, तिथे कबुतरांची संख्या अधिक होती. लोक त्यांना दाणेही टाकायचे. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, कबुतरांमुळे तिला खोकला येत होता.
यानंतर शीतलसाठी आम्ही मोठ्या रुग्णालयात उपचार घेऊ लागलो. पुण्यानंतर मुंबईतील लिलावती रुग्णालयातही आम्ही उपचार घेतले. प्रत्येक ठिकाणी सर्व चाचण्या केल्या जायच्या, पण आजार तोच निघायचा. काही वर्षांनी शीतलची तब्येत आणखी खालावली. तिला चालणे-फिरणे आणि श्वास घ्यायला अडचण निर्माण झाली. तिला रात्रीची झोपही यायची नाही. काही काळाने तिला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली. ती बाहेर जातानाही स्वतःबरोबर एक छोटा ऑक्सिजन सिलिंडर ठेवायची, अशी माहिती मानकर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
शाम मानकर पुढे म्हणाले की, हळूहळू शीतलला २४ तास ऑक्सिजन देण्याची गरज लागली. पुण्यातील डीवाय पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्रात फुफ्फुसांच्या दानासाठी तिचे नाव समाविष्ट करण्यात आले. आम्हाला दोन वेळा फुफ्फुसे मिळाली. पण पहिल्या वेळेस फुफ्फुस जुळत नव्हते, तर दुसऱ्या वेळी फुफ्फुसे खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात मृत्यू
१९ जानेवारी रोजी पाठदुखीमुळे शीतलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शीतल मला म्हणाली की, मी बरी होऊ घरी येईल. पण ती आलीच नाही, अशी दुःखद आठवण शाम मानकर यांनी सांगितली.
शीतल शिंदे यांच्या मृत्यूंतर आता शाम मानकर कबुतरांच्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागृती करत आहेत. कबुतराची विष्ठा दोन ते तीन दिवसांत सुकते आणि त्याचे कण हवेत पसरतात. हवेतील या कणांमुळे काही जण संक्रमित होतात. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास त्याला रोगाची लक्षणे दिसून येतात.