पुणे प्रतिनिधी (Sharad Pawar On Eknath Shinde)
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर केलेल्या आरोपांबाबतही शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली.
तसेच आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे, भाजपाकडून नाही, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एक मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही जास्त बोलत नाहीत. मात्र, त्यांची पुढची भूमिका काय असेल? हे लवकरच कळेल असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांत दिल्लीचे दोन दौरे केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा परत येण्याच्या बाबतीत काही संकेत देत आहेत का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना विचारला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “असे कोणते संकेत वैगेरे काही नाही. आम्ही अशा कोणत्या चर्चा केल्या नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा स्वभाव आहे की ते कधीही जास्त बोलत नाहीत. आता एकनाथ शिंदे यांचा पुढचा मार्ग कसा असेल? याचा अंदाज लवकरच येईल”, असं सूचक भाष्य शरद पवार यांनी केलं आहे.