आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 जळगाव

'कबड्डी महर्षी बुवा साळवी चषक, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार बुधवारपासून

शरद लाटे  269   14-07-2025 06:13:00

पुणे प्रतिनिधी:: 

कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार बुधवारपासून रंगणार आहे. या स्पर्धेबरोबरच पुरुष व महिला 'पुणे लीग कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

या दोन्ही स्पर्धा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संपुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 16 जुलै ते 20 जुलैदरम्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सचिव दत्तात्रय झिंजुर्डे, सतेज संघाचे अध्यक्ष नासीर सय्यद, माणिक गांधिले, राजेंद्र ढमढेरे, संदीप पायगुडे, अर्जुन शिंदे, जंगल रणवरे, अर्जुन ननावरे, आदेश देडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 'ज्यांनी कबड्डीसाठी योगदान दिले. ज्यांनी कबड्डी हा खेळ सातासमुद्रापलीकडे नेला ते कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी करंडक या नावाने ही स्पर्धा अखंडपणे सुरू राहिली पाहिजे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला दिल्याची माहितीही बाबूराव चांदेरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने 'सतेज संघ, बाणेर यांच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून बाबूराव चांदेरे सोशल फाऊंडेशन यांच्या विद्यमाने पुणे लिग कबड्डी स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुरुषांचे 12 संघ व महिलांचे 12 संघ तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिह्यांतून एपूण 336 खेळाडूंनी (पुरुष व महिला) या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. तसेच पुणे लीग स्पर्धेकरिता पुरुषांचे 8 संघ व महिलांचे 8 संघ तयार करण्यात आले आहेत. पुणे जिह्यातून एपूण 352 खेळाडूंनी (पुरुष व महिला) या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

पुणे लिग स्पर्धेत छावा पुरंदर, लय भारी पिंपरी-चिंचवड, शिवनेरी जुन्नर, सिंहगड हवेली, वेगवान पुणे, बलाढय बारामती, झुंजार खेड, माय मुळशी हे पुरुषांचे व महिलांचे संघ कौशल्य पणाला लावणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर होणार असून 6 मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार अनुभवयास मिळणार आहे. दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना एपूण 30 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे अडीच लाख व दीड लाख रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत. याचबरोबर तृतीय व चतुर्थ स्थानी राहणाऱ्या संघांनाही अनुक्रमे एक-एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय दोन्ही स्पर्धांतील सर्वोत्पृष्ट खेळाडू, सर्वोत्पृष्ट चढाई व सर्वोत्कृष्ट पकड, यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.