पुणे प्रतिनिधी :: पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली.
मिरारोड शहरात मराठी विरूद्ध परप्रांतिय वादाच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मिरारोड शहरात येणार आहेत. मिरा- भाईंदर शहरात 29 जून रोजी मराठी - अमराठी असा वाद निर्माण झाला होता.सरकारने हिंदी पर्यायाचा शासननिर्णय रद्द केल्यानंतर मनसे,शिवसेना(उबाठा) आणि मराठी संघटनांनी जल्लोष केला होता.
राज ठाकरे हे 18 जुलै रोजी मिरा- भाईंदरच्या दौर्यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मिरारोडमधील मराठी मोर्चात सहभागी झालेल्या मराठी भाषिकांचे, मराठी प्रेमीचे ज्यांनी मराठी भाषेसाठी निःस्वार्थपणे रस्त्यावर उतरून लढा दिला या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे हे 18 जुलै रोजी सायंकाळी मिरा- भाईंदरमध्ये येणार असल्याचे मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मिरा-भाईंदर दौरा हे मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ देणारे पाऊल ठरणार आहे. ही फक्त भेट नव्हे, तर प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे मनसेचे मिरा-भाईंदर अध्यक्ष संदीप राणे यांनी सांगितले