स्वाती माने प्रतिनिधी ( पिंपरी चिंचवड ) पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा (DP) अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही.
गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत. देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन रद्द केली जातील पिंपरी चिंचवड शहरातील आमदार शंकर शेठ जगताप व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे व सर्वच नेते मंडळी सक्षम आहेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की पिंपरी-चिंचवडकरांच्या आक्षेपांसह पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातील भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, डीपी तयार करताना चुकीच्या पद्धतीने केला आहे. बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केले आणि त्या ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकले आहे. HCMTR मधील साडेतीन किलोमीटरवर लिनिअर गार्डन विकसित केले आहे. पण, प्रारुप विकास आराखड्यामध्ये त्याचा विचार केलेला नाही. आहे तसे आरक्षण ठेवले आहे. थेरगाव येथेसुद्धा हजारो नागरिक बेघर होणार आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मंत्रीमहोदय यांना माहिती दिली. त्यामुळे मंत्रीमहोदय यांनी गोलगोल फिरवणारे उत्तर दिले. सभागृहाला अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. बांधकाम परवागनी घेतलेले आरक्षणे रद्द करावीत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, सध्या प्रारुप आराखडा तयार झाला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. पण, जुन्या डीपीतील 850 आरक्षणे नव्याने प्रस्तावित केली आहेत. जागेवर जावून आरक्षणे निश्चित करावीत. मोशी-आळंदी भागातील कत्तलखाना मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. आमच्या देवस्थानच्या जमिनींवर आरक्षण पडले आहे. ती आरक्षणे रद्द केली पाहिजेत. शहरातील गोरगरिबांनी अर्धा गुंठा, एक गुंठा घेवून बांधलेली घरे बाधित होता कामा नये. भूमिपुत्र भूमिहीन झाला नाही पाहिजे. यासह कोणावरही अन्याय होवू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, SACCC चे आरक्षण कमी करावे. 25 एकरावर असलेले चऱ्होलीतील गार्डनचे आरक्षण कमी करावे आणि ग्रामस्थांसह स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या जमिनींवरील प्रस्तावित आरक्षणे रद्द करावीत. भूमिपुत्रांच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकरी भूमिहीन होता कामा नये. ब्लू लाईन आणि रेड झोनमधील आरक्षणे विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा. यासाठी 'युडीसीपीआर'च्या नियमावलीमध्ये सुधारणा केली पाहिजे. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांनी दाखल केलेल्या हरकती-सूचनांवर नि:पक्षपणे कार्यवाही केली पाहिजे. विकास आराखडा अंतिम करावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली.