Pune:: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, खडकवासला, पुणे येथे 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण' संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना वयाच्या 19-20 व्या वर्षी पेशवेपदाची वस्त्रे दिली. आपल्या 20 वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी 41 लढायांमध्ये अपराजित राहून मराठा साम्राज्याचा काबूलपासून बंगालपर्यंत विस्तार केला. 'वेग' हेच त्यांच्या रणनीतीचे बलस्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्ययज्ञातून जन्मलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे इतिहासातील सर्वांत यशस्वी लढवय्यांपैकी एक होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काळाच्या ओघात काही इंग्रज आणि स्वकीय इतिहासकारांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याला दुर्लक्षित केले, मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या थोर नायकांचा इतिहास उजळून निघत आहे. नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीसारख्या संस्थेत त्यांचा पुतळा उभारला जाणे नक्कीच सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असे गौरवोदगार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचेदेखील आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, आ. रविंद्र चव्हाण, भारतीय लष्कराच्या सी-सदर्न कमांडचे, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, (पीव्हीएसएम) (एव्हीएसएम), नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंह, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.