आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

भेगडे साहेबांची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नव्हतं”; उपमुख्यमंत्री अजित पवार भावूक

नितीन देशपांडे   151   01-07-2025 12:08:56

Pune (Ajit pawar) पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं होतं. त्यांच्या निधनानं शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेलं, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, दोनच आठवड्यापूर्वी 17 जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जावून मी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांना बोलतांना त्रास होत होता, परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ती आमची शेवटची भेट ठरेल, असं कधीच वाटलं नाही. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. 

कृष्णराव भेगडे साहेब सुरुवातीच्या काळात मावळचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर मावळचे नगराध्यक्ष झाले.  1972 ला जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा मावळचे आमदार झाले. 1977 ला काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर 1978 ला पून्हा आमदार झाले. विधान परिषदेवरही दोन टर्म निवडून गेले. नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिर सारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचं काम केलं. पुण्याच्या औद्योगिक, आर्थिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या तळेगाव एमआयडीसीच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान होतं. मावळभूषण, शिक्षणमहर्षींसारख्या अनेक पदव्या, पुरस्कारांनी सन्मानित कृष्णराव भेगडे यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी समर्पित होतं. त्यांचं निधन ही मावळ तालुक्याची, पुणे जिल्ह्याची, महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या चळवळीची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.