आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

Ahilyanagar : टेंभुर्णीत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

नितीन देशपांडे   56   30-06-2025 11:42:30

Ahilyanagar : (Maharashtra police) 

अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांच्या रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्याच्या टेंभूर्णी येथील छापखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 66 लाखांच्या बनावट नोटा आणि इत्तर साहित्य असा 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

 

रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना घार्गे यांनी सांगितले की, राहुरीत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना रात्री 1.30 वाजेच्या सुमारास तिघेजण हे काळ्या रंगाच्या हिरो होंडा शाईन गाडीवरून नगरकडून राहुरीच्या दिशेने बनावट नोटा घेऊन येत असल्याची खबर मिळाली. ठेंगे यांनी राहुरी शहरातील संत गाडगे महाराज विद्यालयासमोर सापळा लावून पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय 33, सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले ( वय 42, कर्जत), तसेच तात्या विश्वनाथ हजारे (वय 40, पाटेगाव, कर्जत), यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे काही नोटा आढळून आल्या. मात्र त्या बनावट असल्याचा संशय आल्याने अ‍ॅक्सिस बँकेचे मॅनेजर यांना बोलावले. त्यांनी संबंधित नोटा बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठेंगे यांनी तपासाची चक्रे फिरवली असता, पप्पू पवार याने या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे छापल्याची कबुली दिली. त्यावरून राहुरी पोलिसांचे एक पथक तत्काळ टेंभुर्णीकडे रवाना होऊन त्या ठिकाणी छापा टाकला.

 

शितल नगर येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घर घेण्यात आले होते. त्या ठिकाणी झेरॉक्स करण्याची मशीन, प्रिंटर, कागद कटिंग करण्याचे मशीन, नोटा बनविण्यासाठीचा कागद, नोटा मोजण्याचे मशीन, लॅमीनेशन मशीन, कंट्रोलर युनिट असा पाच लाखांचा मुद्देमाल सापडला. तसेच पाचशे रुपयांच्या नोटांचे 75 बंडल ज्याची किंमत 37 लाख 50 हजार रुपये आहे. तसेच दोनशे रुपयांच्या बनावट नोटांचे 44 बंडल, ज्याची किंमत 8 लाख 80 हजार, पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट केलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स हे 18 लाख रुपये किंमतीचे आढळले. अशा 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल राहुरी पोलिसांनी टेंभुणीच्या कारवाईतून जप्त केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.