खडकवासला काँग्रेसतर्फे बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानाचा जोडे मारून निषेध
पुणे प्रतिनिधी (Khadakwasla): माजी पाणीपुरवठा मंत्री आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ धायरी येथे खडकवासला युवक काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलन केले. यावेळी लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला,
प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की, हे सरकार कधीच शेतकऱ्यांचे नव्हते, हे लोणीकर यांच्या वक्तव्यातून पुन्हा स्पष्ट झाले. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सरकारने लोणीकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा."
जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण यांनी केला आहे.
बारामती लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष लहू निवंगुणे म्हणाले की की शेतकऱ्यांप्रती सरकारचा दृष्टिकोन आणि आमदार-मंत्र्यांची वागणूक पाहता हे सरकार राज्य चालवण्यास लायक नाही. सर्वांनी राजीनामे द्यावेत आणि जनतेचे राज्य यावे.
आंदोलनात प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, बारामती लोकसभेचे अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, मिलिंद पोकळे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार , अक्षय जैन, शंकरराव दांगट पाटील, आर. जी. यादव, अवधूत मते, सुरेश मते, विश्वजीत जाधव, संजय अभंग, धनंजय पाटील, अजय खुडे, आबा जगताप, प्रकाश टेकाळे, विजय गायकवाड, राकेश सरोदे आणि विक्रांत कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.