आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 उस्मानाबाद

पुणे महापालिकेचा अजब कारभार एकमजली घराला चार मजल्यांचा कर!

शरद लाटे  215   26-06-2025 10:32:17

पुणे (Pune news mahanagar palika)

एकमजली बांधकामाला महापालिकेने चार मजल्यांचा मिळकतकर आकारण्याचा अजब कारभार केला आहे. हा मिळकतकर आता ४३ लाखांच्या घरात गेला आहे. घरमालकाने पाच वर्षे हेलपाटे मारल्यानंतर अखेर करामध्ये दुरुस्ती करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली.

मात्र, त्यासाठी आधी १७ लाख ५० हजार रुपये भरा आणि त्यानंतर मिळकतकरात दुरुस्तीचे बिल घ्या, असा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महपालिकेच्या या निर्णयामुळे सुतारकाम करणारा हा जागामालक हतबल झाला आहे.

 

मुंढवा भागातील शिर्के रस्त्यावर राहत असलेल्या सुरेश सरवदे यांना महापालिकेने हा साडेसतरा लाख रुपयांचा मिळकतकर भरण्यास सांगितले आहे. या भागात सरवदे यांनी दीड गुंठा जागा विकत घेऊन त्यावर अंदाजे १३०० चौरस फुटांचे बांधकाम केले. हे बांधकाम एक मजल्याचे आहे. या बांधकामाला मिळकतकर लावावा, असा अर्ज सरवदे यांनी महापालिकेकडे केला. त्या वेळी मिळकतकर विभागाने चार मजल्यांच्या बांधकामाची नोंद करून त्यांना मिळकतकराचे बिल पाठविले. हा कर जास्त असल्याने सरवदे यांनी तो भरलाच नाही. त्यानंतर २०१७ मध्ये मिळकतकर न भरल्याने त्यांना महापालिकेने साडेपाच लाख रुपयांचे बिल पाठविले.

 

बांधकाम केवळ एक मजल्याचे असताना चार मजल्यांचे बिल कसे भरू, अशी विचारणा करून जागामालक सरवदे यांनी महापालिकेकडे मिळकतकरात दुरुस्ती करावी, यासाठी अर्ज सादर केला. महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. इतकेच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन त्यांना बांधकामदेखील दाखविले. त्यानंतर यामध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन संबधित जागामालकाला देण्यात आले होते.

घराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठीही इतका खर्च झाला नाही, तेवढा मिळकत कर भरा, अन्यथा जप्ती येईल, असे महापालिकेतील अधिकारी सांगत असल्याने महापालिकेच्या या कारभारापुढे जागामालक सरवदे हतबल झाले आहेत. या बिलामध्ये दुरुस्ती करून मिळावी, असा अर्ज सरवदे यांनी मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे केला आहे.

 

एका मजल्याच्या घरासाठी चार मजल्यांचा मिळकतकर लावल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने केली आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गुरुवारी तक्रारदार, तसेच त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. कागदपत्रांची तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल. – अविनाश सकपाळ, उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.