लातूर प्रतिनिधी:- (Latur news) ए झिपरे, लाव तुझ्या बापाला फोन.. असं म्हणत तीन तरुणींना मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने (Police) अखेर हात जोडत माफी मागितली आहे. लातूरमधील (Latur) एका चौकात ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या युवतांना अडवून चांगलाच चोप देण्याचं काम या महिला वाहतूक पोलिसाने केलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाल्यानंतर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर, वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे. जीव लई वर झाला का... रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन तरुणीची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली होती. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असेही मुसने यांनी म्हटले.
बेफाट स्कूटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला पोलीस कॉन्स्टेबलने अडवलं होतं, त्यानंतर शिवीगाळ करत बडवलंही होतं. मात्र, वाहतूक पोलिसाने अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे या घटनेवर समाजमाध्यमातून उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये, बहुतांश नेटीझन्सने महिला पोलीस कॉन्स्टेबलवर प्रखर शब्दात टीका केली होती. त्यानंतर, आता प्रणिता मुसने यांनी हात जोडत माफी मागून हा विषय संपवला आहे.