आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 भंडारा

लंगोट बांधायला देखील पैलवानाचं काळीज लागतं’.. - लांडगे समर्थक आक्रमक

शरद लाटे  46   22-06-2025 22:16:46

पिंपरी (दि. २२ जून २०२५) :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर ‘तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवला? असं वक्तव्य करीत प्रसारमाध्यमात त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा शहर भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार हल्ला चढवला आहे.

पत्रकात साने यांनी म्हटले आहे की, ‘उमेश पाटील हे आज ज्या अजितदादांची पाठराखण करताना दिसतात, त्यांनाच विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी ‘बैलगाडी खालील कुत्रं’ अशी उपमा दिली होती. त्यानंतर याच उमेश पाटलांनी निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. ‘कुत्रं परत येतंय’ म्हणून अजितदादांनी यांना परत गाडीखाली (पक्षात) घेतले. त्यांना कोणीही त्यावेळी कोणत्याही पक्षात घेतले नाही म्हणून हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आलेत’, असेही साने म्हणाले.

‘गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास भाजपने केला आहे. हे शहराच्या जनतेला माहित आहे. विकासाबद्दल आमदार महेश लांडगे यांचेही मोठे योगदान आहे. मुळात लंगोट बांधायला देखील पैलवानाचं काळीज लागतं. ज्या वस्तादाने त्यांना कुस्ती खेळायला शिकवली. लंगोट बांधायला शिकवली त्याच्यांबद्दल आ. महेश लांडगे नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांना तुम्ही शिकवायची गरज नाही. मुळात कृतज्ञता काय असते? हे आधी शरद पवार मग परत अजित पवार पक्षात गेलेल्या कृतघ्न व्यक्तीला कशी कळणार? हवा लागल्यास दिव्यातील वात जशी फडफड करून विझून जाते. तशीच तुमची आज अवस्था झाली आहे. त्यामुळे हिशोबात बोला आणि रहा. अन्यथा भोसरीचा तेल लावलेला पैलवान तुम्हाला कधी चीतपट करील, कळणारही नाही. आम्ही युती धर्म पळतोय म्हणून शांत आहोत’, अशा शेलक्या शब्दात उमेश पाटील यांना पांडाभाऊ साने यांनी सुनावले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.