पुणे- महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे सतत बदलत असताना, इंदापूर तालुका देखील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मागील सहा महिन्यांपासून युवक नेते प्रवीण माने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार, अशी चर्चा जोरात होती.
ही चर्चा आता आणखी पक्की झाली आहे, कारण प्रवीण माने यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करून भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे इंदापूरवर विशेष लक्ष
इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री फडणवीस यांचं कुलदैवत आहे. त्यामुळे इंदापूरच्या मातीशी आणि येथील जनतेशी त्यांचं विशेष नातं आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपची ताकद वाढत असताना, पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या इंदापूर तालुक्यातही पक्षाला बळकट करण्याचा फडणवीसांचा मानस आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ दादा माने यांचे चिरंजीव आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना भाजपमध्ये प्रवेशाचं निमंत्रण देण्यात आल्याचं समजतं.
प्रवीण माने यांचा राजकीय प्रवास
मागील विधानसभा निवडणुकीत प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या युवा नेतृत्वाला आणि तालुक्यातील जनसंपर्काला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे इंदापूरच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवीण माने यांच्यासारखा तगडा युवा नेता पक्षात आल्यास, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला इंदापूर तालुक्यात मजबूत पाय रोवता येऊ शकतात.