कोथरूडमध्ये अत्याधुनिक सुविधांचे सुसज्ज हॉस्पिटल; नितिन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन होणार
पुणे- रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा याला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री सरस्वती कराड हॉस्पिटलची (एसएसकेएच) निर्मिती कोथरुड येथील पौड रोड, विश्वशांती गुरुकुल स्कूलजवळ करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० बेड्सच्या या हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवारी (दि.२३ ) सकाळी १०:३० वाजता केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष भातलवंडे व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.
हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड हे असतील.
मुख्य वैशिष्ट्य…
कोथरुडच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सेवेत रुजू होत असलेले हे हॉस्पिटल केअर (काळजी घेणे), क्युअर (उपचार देणे), हील (बरे करणे) या तत्वांवर बांधलेले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या बहुमजली हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयीन सेवेत १० टक्के सूट दिली जाणार आहे.
उपलब्ध सेवा…
– आपत्कालीन सेवा : सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी २४ तास सेवा उपलब्ध
– वैद्यकीय : हदयरोग, नवजात शिशू, शस्त्रक्रिया याकरिता अतिदक्षता विभाग उपलब्ध.
– मेडिसिन : सर्जरी, प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, सांधेरोपण, मणक्याचे विकार, मानसोपचार
– चिकित्सा : त्वचाविकार, नेत्ररोग, कान -नाक-घसा, बालरोग, कॅन्सर यावर चिकित्सा व उपचार,
– मेंदूविकार : चिकित्सा आणि त्यावरील उपचार आदी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध.